Modi Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला. यात एकूण ४३ नव्या चेहऱ्यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात दोन माजी आयपीएस अधिकाऱ्यांनाही स्थान देण्यात आलं आहे. यात अश्विनी वैष्णव आणि रामचंद्र प्रसाद यांचा समावेश आहे. अश्विनी वैष्णव यांची आज मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. अश्विनी वैष्णव यांनी आयएएस अधिकारी असताना अनेक लक्षवेधी कामं केली आहेत. यात ओडिशाच्या बालासोरमध्ये आलेल्या वादळावेळी बाधित लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी अश्विनी वैष्णव यांनी वाखाणण्याजोगं काम केलं होतं. याच कामानंतर ते चर्चेत आले होते. यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांना पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.
जावडेकर 'आऊट', राणे 'इन'; शिवसेनेला थेट भिडणाऱ्या नेत्याला पंतप्रधान मोदींकडून 'पॉवर'
अश्विनी वैष्णव हे मूळचे राजस्थानच्या जोधपूर येथील रहिवासी आहेत. ते १९९४ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सर्वात आधी त्यांची बालासोरच्या डीएमपदी नियुक्ती करण्यात आली होती. अश्विनी वैष्णव हे नवीन पटनायक यांचे अतिशय जवळचे आणि पसंतीचे अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच नवीन पटनायक मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अश्विनी वैष्णव यांची ओडिशाचं अतिशय महत्वाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कटकच्या कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. अश्विनी वैष्णव यांनी शहरात महत्वपूर्ण बदल केले होते. यात कायदा व सुव्यवस्था क्षेत्रात मोठी सुधारणा केली होती.
महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा!
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर अश्विनी वैष्णव यांच्या प्रवासाला नवं वळण मिळालं. २००३ साली अश्विनी वैष्णव यांना अटल बिहारी वाजपेयी यांचे उपसचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. पुढे वाजपेयी यांची सत्ता गेल्यानंतरही ते अश्विनी वैष्णव वाजपेयींच्या खासगी सचिवपदी कायम राहिले. याच दरम्यान त्यांची भेट नरेंद्र मोदी यांच्याशी झाली. पंतप्रधान मोदी देखील अश्विनी वैष्णव यांच्या कामामुळे प्रभावित झाले. वाजपेयी यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव यांना गोवा पोर्टच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देखील दिला होता. पुढे त्यांनी अनेक खासगी कंपन्यांमध्ये संचालक आणि इतर पदांवर काम केलं. २०१९ साली अश्विनी वैष्णव यांना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं. त्यानंतर आज मोदींनी अश्विनी वैष्णव यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे.