नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्याआधी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काही नव्या चेहऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी मिळू शकते. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाव्य मंत्र्यांशी थोड्याच वेळापूर्वी संवाद साधला. त्यानंतर काही मिनिटांतच ४३ जणांची यादी समोर आली. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.यादीत पहिलं स्थान अन् पहिल्या रांगेचा मान; महाराष्ट्रातील नेत्याची दिल्लीत चर्चा
नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड या चौघांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यापैकी भागवत कराड सोडल्यास उरलेले तिन्ही नेते मूळचे भाजपचे नाहीत. त्यांची पार्श्वभूमी काँग्रेस, राष्ट्रवादीची राहिलेली आहे. नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सातत्यानं शरसंधान साधत असतात. राणेंच्या मागे ताकद उभी करून कोकणात शिवसेनेला नामोहरम करण्याचा भाजप नेतृत्त्वाचा विचार असल्याचं बोललं जातं.मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण? नारायण राणेंसह राज्यातील चार जणांना स्थान; पाहा संपूर्ण यादी
भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र जवळपास अडीच लाख मतांनी त्या पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत कमळ हाती घेतलं. २०१९ मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा जवळपास २ लाख मतांनी पराभव केला.
भिवंडीचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली. पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराचा एक लाखाहून अधिक मताधिक्क्यानं पराभव केला. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी जवळपास दीड लाख मताधिक्क्यानं विजय मिळवला.