पणजी : केंद्रीय आयुष मंत्री म्हणून यापूर्वी काम केलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे अजुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोनच्या प्रतीक्षेत आहेत. नाईक यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होईल की नाही, हे पंतप्रधान मोदी यांचा त्यांना फोन आल्यानंतरच कळून येणार आहे.लोकमतने नाईक यांच्याशी बुधवारी संपर्क साधला. नाईक म्हणाले, की मी दिल्लीत आहे पण अजून तरी मला मंत्रिमंडळातील समावेशाबाबत फोन आलेला नाही. मी कधीच मंत्रीपद मिळावे म्हणून लॉबिंग केले नाही किंवा तशी मागणीही करत राहिलो नाही. यावेळी तर मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे काम सर्वांनाच ठाऊक आहे. मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले असल्याचे कळवणारा अधिकृत संदेश जर आला तर मी निश्चितच तसे जाहीर करेन.दरम्यान, नाईक हे पाचव्यांदा उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 1999 सालापासून सलग पाचवेळा लोकसभा निवडणूक जिंकून नाईक यांनी उत्तर गोव्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून दिल्लीत विविध खाती सांभाळली आहेत. त्यांना मंत्रिपद द्यायला हवे, असे गोवाभाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना व गोवा मंत्रिमंडळाच्याही काही सदस्यांना वाटते. मात्र यावेळी लॉबिंग करायचे नाही, कारण लॉबिंग करणे चुकीचे ठरेल अशी प्रत्येकाची भावना बनली आहे.
सर्व मंत्री दिल्लीतमुख्यमंत्री सावंत यांच्यासह गोवा मंत्रिमंडळातील सर्व मंत्री व विविध सरकारी महामंडळांचे चेअरमन आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आज दिल्लीला जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण सर्व मंत्र्यांना आलेले आहे. गोव्याहून एकूण 45 जण शपथविधी सोहळ्य़ाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतील. यात भाजपच्या मंत्र्यांसह गोवा फॉरवर्डचे मंत्री व दोन अपक्ष मंत्र्यांचाही समावेश आहे.