'पंतप्रधानांना धोका असेल तर पहिली गोळी मी खाईन, केंद्राला पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लावायची आहे' : CM चन्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:27 PM2022-01-07T17:27:54+5:302022-01-07T17:29:28+5:30
' आमच्याकडून सुरक्षेत कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत.'
फिरोजपूर:पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच, पंतप्रधानांवर संकट ओढावले, तर पहिली गोळी खानारा मी असेन, असेही ते म्हणाले. याशिवाय, केंद्र सरकार पंजाबची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप चरणजीत चन्नींनी केला.
केंद्राला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे
एका हिंदी वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, पण अचानक त्यांनी रस्ते मार्गाने येण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसताना त्यांना नोटीस का दिली जात आहे? केंद्र सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत
पंजाबचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंजाबी आणि पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकमेकांवर प्रश्न उपस्थित केले तर अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले की, त्या दिवशी जे घडले, त्यात चूक कोणाची होती आणि सुरक्षेची जबाबदारी कोणाला उचलावी लागेल, यावर चौकशी होईलच. पण, आम्ही स्थापन केलेल्या चौकशी समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्रातील सुरक्षा प्रभारीकडे तपास सोपवण्यात आला होता. पण, सर्वोच्च न्यायालयाने तपास थांबवून योग्य केले, असेही ते म्हणाले.