पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडमधील सरगुजा येथे महारॅलीत सहभागी होण्यासाठी पोहोचले. मुख्यमंत्री विष्णुदेव साय, सरगुजा लोकसभा उमेदवार चिंतामणी महाराज, मंत्री रामविचार नेताम, लक्ष्मी राजवाडे, आमदार रेणुका सिंह यांच्यासह भाजपाचे अनेक मोठे नेते होते. याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, "काँग्रेस हिंसा पसरवणाऱ्यांना पाठिंबा देत असून त्यांना शहीद म्हणत आहे. या काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला दहशतवादी मारल्यावर अश्रू अनावर होतात. अशा कारवायांमुळे काँग्रेसने देशाचा विश्वास गमावला आहे."
छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "राजघराण्यातील राजकुमाराच्या सल्लागाराने काही वेळापूर्वी मध्यमवर्गीयांवर अधिक कर लादले जावेत असं म्हटलं होतं. आता हे लोक एक पाऊल पुढे गेले आहेत. आता काँग्रेसचं म्हणणं आहे की, वारसा कर लावणार आहे, पालकांकडून मिळालेल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’ लावणार आहेत."
"जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावेल आणि जेव्हा तुम्ही जिवंत नसाल, तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा पडेल. म्हणजेच काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, बाद भी... ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला आपली वडिलोपार्जित मालमत्ता मानून ती आपल्या मुलांना दिली, त्यांना आता भारतीयांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना द्यावी असे वाटत नाही."
"काँग्रेस हिंसाचार पसरवणाऱ्यांचं समर्थन करते. या काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला दहशतवादी मारल्यावर अश्रू अनावर होतात. अशा कारवायांमुळे काँग्रेसने देशाचा विश्वास गमावला आहे. काँग्रेसला फक्त तुमचे आरक्षण लुटायचे नाही, त्यांच्या इतरही योजना आहेत. काँग्रेसचे हेतू चांगले नाहीत. त्यांचे हेतू संविधानानुसार नाहीत, सामाजिक न्यायाला अनुसरून नाहीत. तुमच्या आरक्षणाचे रक्षण कोणी करू शकत असेल तर ते फक्त भाजपाच करू शकते" असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.