नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपूर दौऱ्यावेळी रुट लीक होण्याची पुष्टी झाली आहे. रस्ता रोखणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या एका व्हिडीओतून खुलासा झाला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा मार्ग कळताच माईकवरुन आवाहन करत गर्दी जमा करण्यात आली. या व्हिडिओत पोलीस एका बाजूला चहा पित असल्याचं दिसून येते. गर्दी हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला नाही. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे.
आंदोलनकर्त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर पोहचण्याआधी त्यांच्या मार्गक्रमणाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर शेजारील प्यारेआणा गावात माइकवरुन घोषणा करत गर्दी जमवण्यात आली. त्यानंतर रास्ता रोको केला तोपर्यंत शेतकरी संघटनेचे लोकंही पोहचले होते. आंदोलनकर्त्यांनी हे व्हिडिओसमोर कबुल केले. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते केवळ रॅलीत जाणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनाच रोखणार होते.
मेसेज करुन गर्दी जमवली
पंतप्रधान मोदी यांच्या रुटवर आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही पूल जाम केला होता. आम्ही भाजपा कार्यकर्त्यांचा ताफा रोखला होता. त्यानंतर जेव्हा आम्हाला कळालं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा भटिंडा मेगा हायवेवरुन याच रुटवरुन येणार आहेत. तेव्हा तातडीने जवळच्या गावात जात स्पीकरवरुन आवाज देत लोकांना बाहेर पडण्याचं आवाहन केले. त्याशिवाय मेसेज करुन सर्वांना बोलवण्यात आले. त्यानंतर ट्रॉली आणत फ्लायओव्हर जाम करण्यात आला. त्यामुळे ताफा पुन्हा परतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा सुरेक्षेच्या दृष्टीने कुठलाही अडथळा नसणारा असतो. परंतु पंजाब पोलिसांनी त्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. समोर आलेल्या व्हिडिओतून पोलीस आंदोलनकर्त्यांना हटवण्याऐवजी त्यांच्यासोबत उभे असल्याचं दिसून येते. रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जाणूनबुजून रुटचा प्लॅन लीक केला – भाजपा
भाजपा नेत्यांनी आरोप केला की, १० मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार त्या मार्गावर कुठेही जाम नव्हता. मोदी रस्ते मार्गाने येणार असल्याचं समजताच ही माहिती लीक करण्यात आली. त्यानंतर ज्या मार्गाने मोदींचा ताफा जाणार तिथे रस्ता रोको करण्यात आला. सरकारच्या इशाऱ्यावर जाणुनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रोखण्यात आला आहे.