मुंबई : कोरोना व्हायरसने देशामध्ये आणीबाणीची स्थिती आणली असून आकडा रुग्णांचा दिवसेंदिवस कमालीचा वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू लागू करत देशवासियांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. तसेच सायंकाळी पाच वाजता कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिसांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, घंटानाद आणि थाळी वाजविण्याचेही आवाहन केले होते. अखेर आज मोदी यांनी पुन्हा लोकांवर नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाउन संपल्यानंतर लगेचच मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये लोक घराबाहेर पडले असून मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. रविवारी लोकांनी अभूतपूर्व असा बंद पाळला होता. पण सायंकाळी ५ वाजता कोणतातरी उत्सव साजरा करण्यासाठी जमतात तसे जमून सोसायट्या, रस्त्यांवर येत आनंदोत्सव साजरा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा रस्ते गजबजलेले दिसून आले.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. कृपा करून स्वत:ला वाचवावे, आपल्या कुटुंबीयांना वाचवावे. सरकारच्या सूचनांचे नीट पालन करावे. राज्य सरकारांना माझी विनंती आहे की, लोकांकडून नियम आणि कायद्यांचे पालन करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना कोपरखळी हाणली आहे. आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीयेत. प्रिय पतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका केली आहे.