नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (10 ऑगस्ट) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी विरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या नामकरणावरुन नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीत प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे. या आघाडीने विचारही केला नाही की, कोणत्या राज्यात आपले कोणाशी काय संबंध आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
"ही इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. याच्या वरातीत प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते. सर्वांना पंतप्रधान व्हायचे आहे. या आघाडीने विचारही केला नाही की, कोणत्या राज्यात आपले कोणाशी काय संबंध आहेत. पश्चिम बंगालमध्ये आपण (विरोधकांना उद्देशून) टीएमसी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात आहात मात्र दिल्लीत एकत्र आहात. गेल्या वर्षी केरळमधील वायनाडमध्ये ज्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात तोडफोड केली त्यांच्यासोबत हे मांडीला मांडी लावून बसले आहेत", अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
याचबरोबर, घमंडिया आघाडी देशाची अर्थव्यवस्था बुडवणारी आहे असा टोला नरेंद्र मोदी यांनी केली आहे. निवडणुकात जिंकण्यासाठी कधीही पूर्ण न होणारे आश्वासने देणे सुरू असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. याशिवाय, बाहेरुन लेबल बदलू शकता, मात्र मागील पापांचं काय? हेच पाप तुम्हाला घेऊन जातील.जनतेपासून तुम्ही केलेली पापं कशी लपवणार? ही पापं लपवू शकत नाही. परिस्थिती विपरीत असल्याने हातात हात घालून (विरोधी पक्ष) एकत्र आहेत. मात्र परिस्थिती बदलल्यावर विरोधक एकमेकांविरुद्ध वाईट होतील, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले.