तुमच्या अन् माझ्या पैशातून नरेंद्र मोदी स्वत:ची पब्लिसिटी करतायेत; MIM चा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:30 PM2022-08-05T14:30:57+5:302022-08-05T14:31:39+5:30
देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो असं जलील यांनी सांगितले.
नवी दिल्ली - तिरंगा डीपीवर ठेवा, घरावर तिरंगा लावा सांगितले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ५२ वर्ष तिरंग्याला हाती धरलं नाही. परंतु आम्ही स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या तिरंगा हाती घेतो. डिपीवर लावत नाही. आजही लावणार नाही. तिरंगा आमच्या मनात, ह्दयात आणि रक्तात आहे. मोठमोठी होर्डिंग्स लावायची आणि तिरंग्याऐवजी मोदींचा फोटो मोठा लावतात. लसीकरण मोदींचा फोटो. तुमच्या आणि आमच्या पैशात नरेंद्र मोदी स्वत:ची पब्लिसिटी करतायेत असा टोला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
खा. इम्तियाज जलील म्हणाले की, तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही. १३ ते १५ ऑगस्टला माझ्या घरावर झेंडा नाही दिसला तर मी देशद्रोही असं त्यांचे चमचे म्हणणार आहे. देशभक्ती आणि देशद्रोहीचं प्रमाणपत्र देणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही ५२ वर्ष झोपेत होते तेव्हा मी तिरंगा हातात घेऊन फिरत होतो. १५ ऑगस्टला मी भव्य तिरंगा यात्रा काढतो. गेल्या ८ वर्षापासून आमदार झाल्यापासून मी हे करत आहे. मला खूप अभिमान वाटतो. टोपीवाले, दाढीवाले मुस्लीम वाहनावर तिरंगा लावून शहरात फिरतात. आता डीपीवर तिरंगा लावू नका तुमच्या मनात अभिमानाने ठेवा असं जलील यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रात आमची ताकद किती हे आम्हाला माहिती आहे. जर MIM ची ताकद वाटत असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आमच्याकडे यावं. परंतु आम्ही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. पुढील औरंगाबाद महापालिकेत एमआयएमचा महापौर निवडून येणार आहे. एमआयएम ही मुस्लीम पार्टी नव्हे तर सर्व समाजासाठी, जातीसाठी काम करणारी पार्टी आहे हे सर्व औरंगाबादवासियांना माहिती आहे असंही जलील यांनी म्हटलं.
स्वत:च्या स्वार्थासाठी शिवसेनेत वाद
मुस्लिमांची मोठी व्होटबँक आहे. जी काँग्रेस-राष्ट्रवादीपासून दूरावली आहे. ती MIM कडे आली आहे. इतक्या मोठ्या वर्गाला दुर्लक्षित करून तुम्हाला चालणार नाही. भाजपाचा कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचा आहे. शिंदे गटाचा वापर केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरता आहे. एकदा निकाल लागला तर शिंदेंचा कुठे नेऊन ठेवतील सांगता येत नाही. राजकीय स्वार्थासाठी भाजपा शिवसेनेत दोन गट निर्माण करून वाद करत आहे असा आरोप जलील यांनी केला आहे.