'काँग्रेसच्या दहा वर्षात फक्त घोटाळे झाले; देशाची जगभरात बदनामी झाली', PM मोदींनी तोफ डागली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:02 PM2023-02-08T17:02:59+5:302023-02-08T17:03:05+5:30
'काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते, संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता.'
नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचार वाढल्याा आरोपही केला.
यावेळी मोदी म्हणाले की, '2004 ते 2014 या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. त्या दहा वर्षात भारताचा आवाज ऐकायलाही कुणी तयार नव्हतं. पण, त्यानंतर 2014 पासून देशाचे सामर्थ्य वाढले आणि जगभरात देशाचे नाव उंचावले. विरोधकांच्या निराशेचे कारण म्हणजे, देशाची क्षमता वाढत आहे, देशाचे सामर्थ्य वाढ आहे. 2004 पासून 14 पर्यंत यांना मोठी संधी होती, पण यूपीए सरकारने सर्व संधी वाया घालवली. देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले, पण सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. दहा वर्षे हजारो भारतीयांचे रक्त वाहत होते. LOC-LAC वर सुरक्षा वाढवण्याची गरज होती, पण हे सरकार घोटाळ्यात व्यस्त होते.
मोदी पुढे म्हणाले, 'ज्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत होती, तेव्हा हे 2जी घोटाळ्यात अडकले. सिव्हिल न्युक्लीअर करार झाला, तेव्हा हे कॅश फॉर व्होटमध्ये अडकले होते. यांनी हेच खेळ सुरू ठेवले आणि देशाला अंधारात टाकले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले, देशातील खेळाडूंना मोठी संधी होती. पण, हे लोक सीडब्लूजी घोटाळ्यात अडकले आणि देश बदनाम झाला. उर्जेचा कोणत्याही देशाच्या विकासात खूप महत्व आहे. जेव्हा भारताला उर्जेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची गरज होती, त्या काळात देशभरात ब्लॅक आउटची चर्चा व्हायची. यांचा कोळसा घोटाळाही चर्चेत आला,' अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.