नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास घडविला. हा पराक्रम करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी नेते व जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरले आहेत. भाजपचा एखादा नेता ही कामगिरी करू शकेल, असा विचारही फारसा कोणी केला नसेल. मात्र, मोदींनी ही किमया केली.
मोदींना यावेळी मागील दोन कार्यकाळांसारखा जनादेश मिळालेला नाही. त्यांना स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही. निवडणुकीपूर्वी भाजपने चारशे पारचा नारा दिला होता. मात्र, मित्रपक्षांसह तीनशेचा आकडाही त्यांना पार करता आला नाही. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेश, हरयाणा व राजस्थानसह अनेक हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये भाजपची घोडदौड रोखण्यात यश मिळविले. त्यामुळेच निकालानंतर विरोधी पक्षांनी हा निकाल मोदींचा ‘नैतिक पराभव’ असल्याचे म्हटले होते. या निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले. निवडणुकीतून अनेक आव्हाने उदयाला आली असली तरी आगामी काळात भारतीय राजकारण ७३ वर्षीय मोदींभोवती फिरणार आहे. मात्र, या काळात त्यांना युतीच्या राजकारणातील विविध पैलूंना सामोरे जावे लागणार आहे.
सर्वाधिक फटका बसला तरीही...लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला. असे असतानाही सर्वाधिक १० मंत्रिपदे ही या राज्याला देण्यात आली आहेत. त्या खालोखाल बिहारला ८ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. गुजरातमध्ये ५ खासदारांना मंत्रिपद देण्यात आले तर कर्नाटकला ५ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ६ खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. पंजाबमध्ये एकही जागा जिंकलेली नसताना येथे १ मंत्रिपद देण्यात आले आहे.
पांढरा कुर्ता-पायजमा, निळे जॅकेटचा पेहराव; २०१९ मध्येही असाच पोशाख नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताना चुडीदार पायजम्यासह पांढरा कुर्ता आणि निळे जॅकेट परिधान केले होते. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींनी काळे बूट घातले होते.- २०१४ मध्ये मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनी क्रीम रंगाचा कुर्ता-पायजमा आणि फिकट सोनेरी रंगाचे जॅकेट घातले होते. २०१९ च्या शपथविधी सोहळ्यातही मोदींनी जवळपास असाच पोशाख निवडला होता.- महत्त्वाच्या प्रसंगी मोदींचा आवडता पोशाख म्हणजे कुर्ता आणि बंद गळ्यातील जॅकेट. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभातही ते आकर्षक आणि रंगीबेरंगी पगडी परिधान करताना दिसले आहेत.
शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला रविवारी देशातील दिग्गज उद्योगपतींनी उपस्थिती लावली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांचे पुत्र अनंत, जावई व उद्योगपती आनंद पिरामल, प्रख्यात उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हेही पत्नी प्रीती, मुलगा करण तसेच आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला सोहळ्यासाठी आले होते.
अनंत अंबानी, आनंद पिरामल आणि सुपरस्टार शाहरुख खानसोबत आले होते. याशिवाय रिन्यू पॉवरचे प्रवर्तक सुमंत सिन्हा, अपोलो टायर्सचे प्रवर्तक राैनक सिंह, टाटा ग्रुपचे एन. चंद्रशेखरन, कोटक महिंद्राचे उदय कोटक, हिरो ग्रुपचे सुनील मुंजाल, ललित हॉटेल्सच्या ज्योत्स्ना सुरी, श्रद्धा सुरी मारवाह, दालमिया ग्रुपचे पुनीत दालमिया, महिंद्राचे ग्रुप सीईओ आणि फिक्कीचे अध्यक्ष अनिश शाह, टाटा ग्रुपचे नोएल टाटा, न्यायमूर्ती एस. व्ही. भट्टी, जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदल, लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा, एस्सारचे प्रशांत रुईया, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, जेएसपीएल प्रवर्तक, भाजप खासदार नवीन जिंदल, सुपरस्टार रजनीकांत, गायिका अनुराधा पाैडवाल, अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता अक्षय कुमार, अनुपम खेर, पवन कल्याण हेही सोहळ्याला उपस्थित होते.