नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. यावेळी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन मोदींनी केले. मात्र सध्या लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत या संबोधनात मोदींना एक शब्दही उच्चारला नाही. दरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात चीनबाबत अवाक्षरही न काढल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे.
चीनबाबत एकही शब्द न उच्चारणाऱ्यां पंतप्रधानांवर काँग्रेसने ट्विटरवरून निशाणा साधला आहे. चीनवर टीका करणे तर सोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख करायलासुद्धा घाबरतात, असा टोला काँग्रेसने लगावला. तसेच मोदींनी आपल्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याची माहिती अध्यादेश काढूनसुद्धा देता आली असती, अशी टीकाही काँग्रेसने केली.
दरम्यान, काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, चीनने भारताच्या हद्दीत ४२३ मीटरपर्यंत आत घुसखोरी केली आहे. २५ जूनपर्यंत चीनने भारताच्या सीमेत १६ तंबू आणि टरपॉलिन उभे केले आहेत. इथे चीनने एक मोठे शेल्टर उभारले आहे. तसेच या भागात चीनच्या सुमारे १४ गाड्या उभ्या आहेत. पंतप्रधान ही बाब नाकारू शकतात का? असा सवालही काँग्रेसने विचारला आहे.
सध्या देशाला अशा नेत्याची गरज आहे जो आपले अपयश कबूल करेल. तसेच त्याच्यात सुधारणेस वाव आहे हे मान्य करेल. समस्यांकडे दुर्लक्ष करून त्याबाबत बोलणे टाळणाऱ्या नेत्याची गरज नाही, असा टोलाही काँग्रेसने लगावला.