नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. रात्री उशिरा खातेवाटपदेखील जाहीर झालं. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जवळपास डझनभर मंत्र्यांनी राजीनामे दिले. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना नारळ देण्यात आला. त्यांची खात्याची जबाबदारी आता मनसुख मंडाविया यांच्याकडे असेल. कोरोना संकटात उत्तम कामगिरी करून दाखवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. मंडाविया पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. मंडाविया यांच्याकडे आरोग्य मंत्री होताच मोदींचा ९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डझनभर मंत्र्यांचे राजीनामे घेताना मोदींनी ७ जणांना प्रमोशन दिलं. या ७ जणांमध्ये मंडाविया यांचा समावेश आहे. २०१२ मध्ये मंडाविया यांना पहिल्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात आलं. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ सूरतमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींनी या कार्यक्रमात मंडावियांचं कौतुक केलं. 'मनसुखभाईंचं भविष्य उज्ज्वल आहे,' असे उद्गार त्यांनी काढले. मंडावियांबद्दल मोदींच्या मनात विश्वास होता. त्यामुळेच भविष्यवाणी करताना मोदींनी आपण करत असलेलं विधान डायरीत लिहून घेण्यास सांगितलं.
मोदींनी ९ वर्षांपूर्वी केलेल्या विधानाचा व्हिडीओ रवी घियर नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर शेयर केला आहे. त्यात मोदी गुजरातीत बोलताना दिसत आहेत. 'तुम्हाला वाटलं असेल, आपले मनसुखभाई राज्यसभेत जात आहेत. त्यांचा सन्मान होतोय, तर त्या कार्यक्रमाला जाऊया. मित्रांनो आजची घटना इतकी लहान नाही. आजची तारीख लक्षात ठेवा. ९ वाजून ३५ मिनिटं झाली आहेत. मी जे बोलतोय, ते ज्यांना डायरीत लिहायचं असेल ते लिहून घ्यावं. मनसुखभाईंचं भविष्य किती उज्ज्वल आहे ते मला स्पष्ट दिसतंय. त्यांच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि माझं विधान खरं ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही,' असं मोदींनी ९ वर्षांपूर्वी म्हटलं होतं.