नवी दिल्ली - देशात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस (Sadbhavan Diwas) साजरा केला जातो. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा याच दिवशी जन्म झाला होता. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांना एक दूरदर्शी नेता मानले गेले. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
राजीव गांधींचा जयंतीदिन देशात (Rajiv Gandhi Jayanti) सद्भावना दिवस आणि राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र राहावे, सर्व धर्माच्या लोकांमध्ये बंधुता आणि सामाजिक ऐक्य, प्रेम आणि आपुलकी जागृत करणे हा सद्भावना दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. काँग्रेसने हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज ट्विटरवरुन राजीव गांधींना आदरांजली वाहिली.
3 वर्षे केंब्रीजमध्ये घेतले शिक्षण
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. शालेय जीवनात ते लाजाळू होते. प्रथम दिल्ली आणि नंतर देहराडूनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांनी केंब्रिजमध्ये तीन वर्षे शिक्षण घेतले पण त्यांचा अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही. 1966 मध्ये त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा कोर्स सुरू केला, परंतु त्यांना येथे पदवी मिळवता आली नाही आणि ते भारतात परतले. नंतर राजीव गांधींनी स्वतः सांगितले होते की, ‘मला परीक्षेसाठी चकरा मारणे अजिबात आवडत नाही.’