नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाबाबत पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहाराद्वारे त्यांनी नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय आणि तीन मूर्ती भवनामध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू केवळ काँग्रेसचेच नेते नव्हते तर संपूर्ण देशाचे नेते होते, असे म्हणत मनमोहन सिंग यांनी वास्तूंमधील प्रस्तावित बदलांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मनमोहन सिंग यांनी पत्रात म्हटलंय की, 'तुमचे सरकार अजेंड्यासहीत नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाची संरचना बदलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड केली जाऊ नये, अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे'.
दरम्यान, दिल्लीतील तीन मूर्ती भवनात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मनमोहन सिंग यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरूंचा वारसा व योगदान पुसण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.
'अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात तीन मूर्ती भवनासोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नव्हती, मात्र आताचे सरकार आपल्या अजेंड्यासहीत असे करताना दिसत आहे, ही बाब दुर्दैवी आहे', असेही मनमोहन सिंग यांनी नमूद केले आहे.