मुंबई - देशात वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळत असून वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढत आहे. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून याच आठवड्यात आचरसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते विविध राज्यातील विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडत आहे. त्यातच, पंतप्रधान मोदी आज १० नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे आज या ट्रेनचा शुभारंभ मोदींच्याहस्ते होत आहे. एकूण ८५ हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचे आज लोकार्पण होत आहे.
विशेष म्हणजे भगव्या रंगातील वंदे भारतला पहिल्यांदाच हिरवा कंदील दाखण्यात येत असून आजपासून भगवी ट्रेन पटरीवर धावत आहे. भारतीय रेल्वेची हायस्पीड ट्रेन म्हणून वंदे भारतला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई-सोलापूर मार्गावरुन पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती, निळ्या आणि पांढऱ्या रंगात या ट्रेन सुरू झाल्या होत्या. जलद गती प्रवा, आरामदायी आणि स्वच्छ व वातानुकूलित कोचमुळे ही ट्रेन प्रवाशांच्या पसंती उतरली आहे. त्यातच, आता नव्या रंगात, नव्या ढंगात ही ट्रेन रेल्वे मार्गांवर धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सिलगुडी स्टेशनवरील जलपाईगुडी आणि पाटणा दरम्यान धावणाऱ्या नवीन वंदे भारत एक्सप्रेसला ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवतील. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भगव्या रंगातील वंदे भारत आज रेल्वे पटरीवर धावणार आहे. देशभरातील १० मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यामध्ये, मुंबईतून अहमदाबादसाठी ही ट्रेन धावेल.
अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, म्हैसूर-डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई), पाटणा-लखनौ, न्यू जलपाईगुडी-पाटणा, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ-डेहराडून, कलबुर्गी-सर एम विश्वेश्वरैय्या या ट्रेन्सला आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. टर्मिनल बेंगळुरू, रांची-वाराणसी, खजुराहो-दिल्ली (निजामुद्दीन), या १० मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहेत.