ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाने देशाला दिलेली भेट आहे हे भाजप नेत्यांचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटलेले नसून, संघाने आपली नाराजी भाजप नेत्यांच्या कानावर घातल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. संघाने भाजपाला राष्ट्रवादाचा मुद्दा लावून धरताना विकासाचा दृष्टीकोन ठेवून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
राजस्थान नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर मंगळवारी दीनदयाळ शोध संस्थेच्या कार्यालयात आरएसएस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. आरएसएसकडून सुरेश भय्याजी जोशी, क्रिष्ण गोपाळ, दत्तात्रय होसांबळे बैठकीला उपस्थित होते तर, भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा, सरचिटणीस रामलाल आणि उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्ध उपस्थित होते.
नरेंद्र मोदी हे देशाला मिळालेले गॉड गिफ्ट आहे या केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या विधानावर आरएसएस नेत्यांनी आपली नाराजी प्रगट केली. संघटना सर्वोच्च असून व्यक्तीपूजेपासून दूर रहाण्याचा सल्ला त्यांनी भाजप नेतृत्वाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.