भाजप नेते तथा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीछत्तीसगड सरकारच्या एक उपक्रमावर जाम खुश झाले आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या गडकरी यांनी भूपेश बघेल सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. प्रत्युत्तरात बघेल यांनीही गडकरींचे आभार मानत कौतुक केले आहे.
शेणापासून तयार करण्यात आलेल्या रंगाच्या वापरासंदर्भात गडकरींनी बघेल सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी एमएसएमई मंत्री असताना याची सुरुवात केली होती, असे गडकरी यांनी म्हटले आहे. गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ''सरकारच्या विभागीय बांधकामांमध्ये शेणापासून तयार करण्यात आलेला नैसर्गिक रंग वापरण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिल्या बद्दल, मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री, भूपेश बघेल यांचे अभिनंदन करतो. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे.''
आणखी एका ट्विटमध्ये गडकरी म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात MSME मंत्री असताना आम्ही याची सुरुवात केली होती. नैसर्गिक रंग वापराने पर्यावरणाचे संरक्षणच तर होईलच, शिवाय शेतकऱ्यांनाही रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होईल. यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.'' यानंतर बघेल यांनी नितिन गडकरी यांचे आभार मानत त्यांना कर्मयोगी असे म्हटले आहे.
भूपेश बघेल यांनी ट्विट करत, "सादर धन्यवाद! आदरणीय नितिन गडकरी जी. छत्तीसगड सरकारचा हा कर्मयोग एक “कर्मयोगी”च ओळखू शकतो. केवळ बोलूनच नाही, तर प्रामाणिक हेतूने देश आणि राज्ये इतरांसाठी प्रेरणादायी बनतात. गोधन आणि श्रमाचा सन्मान हा गांधींचा मार्ग आहे. आम्ही त्यावर पुढे जात आहोत," असे म्हटले आहे.