नवी दिल्ली, दि. 2 - पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामावर प्रचंड खूश असून त्यांचं मंत्रालय कायम ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असून यावेळी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले रेल्वे मंत्रीपद नितीन गडकरी यांना देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, नितीन गडकरी आपलं खातं समर्थपणे सांभाळत असून मोदींनी घेतलेल्या कामगिरीच्या आढाव्यात नितीन गडकरी पुर्ण मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी १० वाजता होणार असून, त्याची सगळी तयारी झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी रेल्वेसमोरील आव्हाने पुर्ण करण्यासाठी, तसंच खासकरुन रेल्वे सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता नितीन गडकरींकडे हे खातं सोपवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता नितीन गडकरींचं खातं न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल करण्यात येणार असून नितीन गडकरींचं नाव यादीत आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याआधी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यासाठी 'पॉझिटिव्ह' आणि 'निगेटिव्ह' अशा दोन प्रकारात कामाचं विभाजन करण्यात आलं होतं. मोदींच्या या परफॉर्मन्स चार्टमध्ये नितीन गडकरी पहिल्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना स्वत:लाही रेल्वे मंत्रालयाची घेण्यात कोणतंच स्वारस्य नव्हतं.
पक्षाने फक्त कामगिरीचा आढावा न घेता पक्षाने जाहीर केलेल्या योजना, उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशाप्रकारे काम करण्यात आलं याचीदेखील दखल घेतली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश प्रभू यांना कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे. भाजपा सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाच्या फेररचनेचा फटका दोन डझन मंत्र्यांना बसण्याची शक्यता आहे.