ऑनलाइन लोकमत
रायपूर ,दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गॉगल घालून स्वागत करणे छत्तीसगडमधील जिल्हाधिका-यांना चांगलेच भोवले आहे. छत्तीसगड सरकारने संबंधीत जिल्हाधिका-यांना नोटीस बजावत यापुढे खबरदारी घेण्याची तंबी देण्यात आली आहे.
९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगड दौ-यावर आले असताना रायपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी छत्तीसगड प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जगदलपूरचे जिल्हाधिकारी अमित कटारिया हेदेखील विमानतळावर उपस्थित होते. कटारिया यांनी गॉगल लावूनच मोदींचे स्वागत केले होते. पण या प्रकारामुळे छत्तीसगड सरकारचा चांगलाच तीळपापड झाल्याचे दिसते. रमणसिंह सरकारने या कारणावरुन अमित कटारिया यांना थेट नोटिस बजावली आहे. विशेष बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने यावर काहीही आक्षेप घेतला नसताना रमणसिंह सरकारने कटारियांना नोटीस का बजावली असा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे. कटारिया यांच्यासोबतच दंतेवाडा येथील वरिष्ठ अधिका-यालाही नोटिस बजावण्यात आली असून या अधिका-याने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचे सांगितले जाते. अमित कटारिया हे २००४ बॅचचे आयएएस अधिकारी असून छत्तीसगडमधील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.