नवी दिल्ली : १६ वी लोकसभा स्थापन होऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला असताना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी किंवा विरोधी पक्षांच्या एकाही खासदाराने आपल्या निधीतून एकही रुपया विकासाच्या नावावर खर्च केलेला नाही. खासदारांसाठी स्थानिक विकास निधी राखून ठेवलेला असतो. ३६ पैकी १० राज्यांतील खासदारांनी मतदारसंघांच्या विकासासाठी निधीची उचल केल्याची माहिती सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दिली आहे.देशभरात निधीच्या वापराबाबत आकडेवारी पाहता केवळ १.८२ टक्का निधी जारी झाला आहे. निवडणूक असलेल्या दिल्लीसह उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसामच्या खासदारांनी निधीची उचल केली असली तरी आपापल्या मतदारसंघात कोणतेही काम सुरू केलेले नाही. मे २०१४ पासून १ जानेवारी २०१५ या काळात खासदारांना १२४२.५० कोटी रुपयांचा विकासनिधी मिळाला. उत्तर प्रदेशातून निवडून आलेल्या ८० खासदारांमध्ये मोदींचाही समावेश असून या राज्याने पहिल्याच टप्प्यात १९७.५० कोटी रुपयांचा निधी उचलला आहे. मात्र, सहा महिने उलटूनही एकाही खासदाराने विकासकाम सुरू केले नाही. उत्तर प्रदेशात भाजपचे ७१, अपना दल-२, काँग्रेस-२, तसेच समाजवादी पक्षाच्या पाच खासदारांचा (पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव, त्यांच्या स्नुषा डिंपल यादव, पुतण्या धर्मेंद्र आणि अक्षय तसेच नातू तेजप्रताप) त्यात समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नरेंद्र मोदी यांनी विकासावर रुपयाही खर्चला नाही
By admin | Published: February 02, 2015 1:34 AM