नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संत रविदास जयंतीदिनीचं औचित्य साधून येथील पुजाऱ्याची इच्छा क्षणात पूर्ण केली. दिल्लीतील संत रविदास मंदिरात जंयतीदिनी दर्शनासाठी मोदी गेले होते. त्यावेळी, मंदिरातील पुजाऱ्याने आपलं गाऱ्हाणं पंतप्रधानांसमोर मांडलं. मोदींनी तात्काळ कुणाला तरी हाक मारली आणि संबंधित पुजाऱ्याची अडचण दूर करण्याचे निर्देश दिले. या घटनेनं पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
मोदींनी बुधवारी मंदिरात जाऊन पूजा आरती केल्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून येथील मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने मोदींची भेट घेतली. या क्षणाचा फोटोही समोर आला आहे. यावेळी, मोदींनी पुजाऱ्याची समस्या ऐकून तात्काळ दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना बोलावून संबंधित पुजाऱ्याच्या अडचणीबद्दल काही निर्देश दिल्याचे दिसून आले. दरम्यान, याबाबत पुजारी यांनी आज तकशी बोलताना सर्व हकीकत सांगितली.
मोदींनी मला विचारलं आपण कुठले रहिवाशी आहात, त्यावेळी मी श्रावस्तीचा रहिवाशी असल्याचे उत्तर दिले. मुलांना शिकवता का नाही? असा प्रश्नही मोदींनी केला. मोदींच्या या प्रश्नावर निराश झालेल्या पुजाऱ्याने अडचण सांगितली. श्रावस्ती येथील खासदारांना दोनवेळा भेटलो, पण अद्यापही सरकारी शाळेत प्रवेश घेण्यासाठी अडचण येत असल्याचं पुजाऱ्याने मोदींना सांगितले. त्यावेळी, भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना बोलावून मोदींनी त्यांना पंडितजींच्या मुलांच्या प्रवेशाच्या अडचणी दूर करण्याचं सांगितलं. मोदींच्या या व्यवहारामुळे मी भावूक झाल्याचंही पुजाऱ्याने सांगितले.
दरम्यान, येथील मंदिरात मोदींनी आज भाविक भक्तांसमवेत भजनात सहभाग घेतला. या भजनाचा व्हिडिओ ट्विट करत मोदींना हा आनंदी क्षण असल्याचं म्हटलं. वाराणसीच्या सीरगोवर्धन गावात कवि संत रविदास यांचा जन्मा झाला होता. दरवर्षी दिल्लीत रविदास जंयतीदिनी मोठा सोहळा होत असतो. पंजाबहून येथे दर्शनासाठी श्रद्धाळू लोकं येतात.