नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गुजरातमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस पाकिस्तानच्या मदतीने निवडणूक लढत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांसोबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली असा आरोप केला होता. त्यानंतर या सर्व राजकारणाला सुरुवात झाली.
काँग्रेसने लागलीच पंतप्रधानांचा हा आरोप फेटाळून लावला होता. देशाच्या सर्वोच्चपदावर बसून पंतप्रधान मोदी निराधार आरोप करत आहेत. चिंता आणि हताशेमधून ते असे आरोप करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले होते. पण आता जी माहिती समोर आलीय त्यानुसार मोदींनी केलेल्या आरोपात तथ्य असून 6 डिसेंबरला मणिशंकर अय्यर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अशी बैठक पार पडली.
या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमहू कसुरी, माजी लष्करप्रमुख दीपक कपूर, माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह तसेच पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले काही अधिकारी उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपरराष्ट्रपती हमीद अन्सारीही या कार्यक्रमाल उपस्थित होते. लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले.