प्रयागराज – अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागाला खासदार असदुद्दीन औवेसी यांनी विरोध केला होता. आता यावरुन साधू-संतांच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने औवेसींवर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा हिंदू आहेत, त्यानंतर देशाचे पंतप्रधान आहेत असं महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले आहे.
आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गिरी म्हणाले की, औवेसी यांना सनातन धर्माच्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना भारतात होणारं कोणतंही काम चांगले वाटत नाही. प्रत्येक बाबतीत राजकारण करत राहतात. औवेसी यांनी ५ ऑगस्टला टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहावा आणि संपूर्ण वेळ राम नामाचा जप करावा, अल्लाह नामासोबत रामराम बोलायला हवं असा टोलाही महंतांनी दिला आहे.
तसेच औवेसी यांना स्वत:च्या धर्माची माहिती आहे ना सनातन धर्माची, फक्त देशातील वातावरण बिघडवण्यासाठी ते काम करतात. सनातन धर्मासाठी पहिल्यांदा धर्म आणि राम आहे. नंतर संविधान आहे. आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो, त्याचा आदर करतो. पण संविधान रामाच्या वर असू शकत नाही. प्रभू रामाच्या मंदिराचं निर्माण होण्यापासून देशात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमात सहभागी झाल्यानं कोणत्याही प्रकारे संविधानाचं उल्लंघन असणार नाही, कारण मंदिर निर्माणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला आहे असंही महंत नरेंद्र गिरी यांनी औवेसींना सुनावलं. दरम्यान, राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला अयोध्येत येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. औवेसी यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीला विरोध केला आहे.
काय म्हणाले होते औवेसी?
असदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा सवाल उपस्थित केला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनने नेपाळच्या दिशेनं टाकलं आणखी एक पाऊल; भारताला लागली धोक्याची चाहूल
Fact Check: रक्तातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ॲप डाऊनलोड करा; मेसेजमागचं सत्य उघड
अयोध्येत उत्साह शिगेला; भूमीपूजनाच्या दिवशी प्रभू रामाला हिरव्या रंगाचा पोशाख घालणार, कारण...
‘मॉडर्ना’च्या कोरोना लस चाचणीला मोठं यश; व्हायरसचं खात्मा होणार अन् संसर्गही रोखणार
क्रूरता! युवकाला झाडाला बांधून अमानुष मारहाण करत मूत्र पाजले; संतापजनक व्हिडीओ व्हायरल