पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील अदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. माझ्या कुटुंबामुळे मला लक्ष्य करण्यात आलं, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण, आता संपूर्ण देश म्हणतोय की मी मोदींचा परिवार आहे. घराणेशाही पक्षाचे चेहरे वेगवेगळे असू शकतात परंतु चारित्र्य एकच आहे. त्यांच्या चारित्र्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे खोटं बोलणं आणि दुसरं म्हणजे लुटणं असंही म्हटलं आहे.
"आज संपूर्ण देशात मोदींच्या गॅरंटीची जोरदार चर्चा सुरू आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे पूर्ण होण्याची गॅरंटी. जणू काही TRS चं BRS झाल्यानंतर तेलंगणात काहीही बदललं नाही. तसेच काँग्रेसने बीआरएसची जागा घेतल्याने काहीही बदल होणार नाही. हेच लोक आहेत. ते मला उद्या सांगू शकतील की तुम्ही कधी तुरुंगात गेला नाहीत, त्यामुळे तुम्ही राजकारणात येऊ शकत नाही."
"140 कोटी देशवासी माझं कुटुंब आहेत"
"माझे जीवन हे एक पुस्तक आहे. देशवासियांसाठी जगेन हे स्वप्न घेऊन मी बालपणी घर सोडलं. माझा प्रत्येक क्षण फक्त तुमच्यासाठी असेल. माझे कोणतेही वैयक्तिक स्वप्न नाही. तुमची स्वप्न हेच माझे संकल्प होतील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी माझं आयुष्य खर्च करेन. देशातील कोट्यवधी जनता मला आपलं मानते. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानते. 140 कोटी देशवासी हे माझं कुटुंब आहे."
"हे तरुण माझं कुटुंब आहेत. देशातील कोट्यवधी मुली, माता, भगिनी हे मोदींचं कुटुंब आहे. देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती हे माझं कुटुंब आहे, मुलं आणि वृद्ध देखील मोदींचं कुटुंब आहेत. ज्यांचं कोणीही नाही, तेही मोदींचे आणि मोदीही त्यांचेच आहेत. माझा भारत माझं कुटुंब आहे. मी तुमच्यासाठी जगतोय आणि लढतोय" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
अबकी पार 400 पार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "कालही मी दिवसभर सर्व मंत्री, भारत सरकारचे सर्व वरिष्ठ सचिव आणि अधिकारी, म्हणजेच टॉप टीम, जवळपास 125 लोकांशी निवडणुकीबाबत चर्चा केली नाही. विकसित भारताच्या उभारणीसाठी मी प्रत्येक मुद्द्यावर तपशीलवार चर्चा केली. यावेळी प्रत्येकजण 400 पार बद्दल बोलत आहेत."