अहमदाबाद: काल(10 मार्च) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. यात पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. या विजयानंतर भाजप पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. काल निकाल जाहीर झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पीएम मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी भव्य रोडशो केला, यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीपंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता दिल्लीहून अहमदाबाद विमानतळावर पोहोचले, त्यानंतर त्यांनी विमानतळावरुनच रोड शोला सुरुवात केली. या रोड शोदरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोदींच्या रोड शोमध्ये जय 'श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या.
असा आहे मोदींचा गुजरात दौरागुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सांगितल्यानुसार, कमलम येते नरेंद्र मोदी भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच, संध्याकाळी अहमदाबादच्या GMDC मैदानावर 'मारु गम, मारू गुजरात' या महापंचायत संमेलनाला संबोधित करतील. यामध्ये तालुका आणि जिल्हा पंचायत सदस्य आणि नगरपरिषदांसह 1.38 लाखांहून अधिक निर्वाचित लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
मोदींच्या हस्ते खेळ महाकुंभ कार्यक्रमाचे उद्घाटनशनिवारी सकाळी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित असतील. त्यानंतर संध्याकाळी मोदींच्या हस्ते खेळ महाकुंभ कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी 47 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. याअंतर्गत राज्यभरात 500 हून अधिक ठिकाणी विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.