श्रीनगर - आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरे वाढले असून देशातील अनेक राज्यात ते विकासकामांचा शुभारंभ करत आहेत. आचार संहिता लागू होण्यापूर्वी हजारो कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्याचसाठी आज पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आले आहेत. येथील जनतेला ६४०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प भेट देतील आणि १००० तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्र देतील. दरम्यान, काश्मीरमध्ये पोहोचताच मोदींनी शंकराचार्य टेकडीचे दर्शन घेतले.
लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. मोदी आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास काश्मीरमध्ये पोहोचले. त्यानंतर, मोदींनी येथील शंकराचार्य टेकडीचे दर्शन घेऊन दुपारी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये 'विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर' कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांचा 'संमिश्र कृषी विकास कार्यक्रम' राष्ट्राला समर्पित केला. तसेच, स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेंतर्गत १४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पणही केले. ज्यामधये 'हजरतबल तीर्थाचा एकात्मिक विकास' प्रकल्पाचाही समावेश आहे. याशिवाय पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील सुमारे १००० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.
पृथ्वीवरील स्वर्गात येण्याचं वर्णन शब्दात करणे कठीण आहे. आपणा गेल्या अनेक दशकांपासून ज्या जम्मू काश्मीरच्या प्रतिक्षेत होतो, ते हेच नवं जम्मू काश्मीर आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींनी याच जम्मू काश्मीरसाठी बलिदान दिलं होतं. येथील डोळ्यांत भविष्याची चमक दिसून येते, तर नवीन आव्हांनांची पूर्ती करण्याची जिद्दही दिसून येत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
जम्मू काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे, कलम ३७० हटल्यानंतरच हे शक्य झालं. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी कलम ३७० च्या नावाखाली काश्मीर आणि देशातील जनतेची दिशाभूल केली. ३७० कलमाचा फायदा हा जम्मू काश्मीरला होता की, काही राजकीय पक्षांना हे जनतेला आता कळून चुकलं आहे. आज येथे ३७० नसल्याने तरुणांच्या प्रतिभाशक्तीला संधी मिळत आहे, त्यांच्या कल्पनांचा सन्मान होत आहे, असेही मोदींनी कलम ३७० चा उल्लेख करत म्हटले.
३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींच्या या जाहीर सभेत २ लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा भाजपचा दावा आहे.