तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एमके स्टॅलिन चालता चालता अचानक अडखळले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लगेचच सावरल्याचं पाहायला मिळत आहे. खेलो इंडिया युथ गेम्सच्या ठिकाणी जात असताना दोघेही पायऱ्या चढत होते.
एमके स्टॅलिन त्यावेळी अडखळतात, पण मोदी त्यांना हाताने पकडतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन आणि पंतप्रधान मोदी एकत्र सर्वत्र फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी हेही त्यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी होते. अचानक स्टॅलिन यांचा तोल गेला आणि पीएम मोदींनी त्यांना आधार दिला. यानंतर दोघेही स्टेजवर पोहोचले आणि प्रेक्षकांना अभिवादन केलं.
खेलो इंडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "केंद्र सरकार 2036 च्या ऑलिम्पिक खेळांत जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे." यूपीए सरकारच्या काळात खेळाशी संबंधित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांचा दाखला देत त्यांनी दावा केला की, गेल्या 10 वर्षांत भाजपा सरकारने 'खेळातील खेळ' संपवला आहे.
याच दरम्यान, एमके स्टॅलिन म्हणाले की, तामिळनाडूला देशाची क्रीडा राजधानी बनवणे हे डीएमके सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 'खेलो इंडिया युवा खेळ 2024' चे उद्घाटन केले. याचदरम्यान एमके स्टॅलिन यांच्याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.