JD Vance in India : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी पंतप्ररधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी राजस्थानमधील एका कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, माझी तीन मुले या जगातील दोन नेत्यांच्या खूप जवळची आहेत, पहिले ट्रम्प आणि दुसरे मोदी. यावेळी व्हेन्स यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला त्याच्या पाचव्या वाढनिमित्त पंतप्रधान मोदींनी दिलेल्या गिफ्टबद्दल विशेष आभार मानले.
मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते!जेडी व्हेन्स पुढे म्हणाले, अमेरिका आणि भारत एकत्रितपणे खूप काही साध्य करू शकतात असा माझा विश्वास आहे. अमेरिका जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतासोबत जास्त लष्करी सराव करतो. भविष्यात दोन्ही देशांना आवश्यक असलेल्या मोठ्या गोष्टी उभारण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्यासाठी आपण एकत्र काम करू शकतो. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. येणाऱ्या काळात लोक भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीबद्दल बोलतील. भारत-अमेरिका गुंतवणूक, व्यापार आणि भागीदारी दोन्ही देशांसाठी फायदेशीर आहे, अशी प्रतिक्रिया व्हेन्स यांनी व्यक्त केली.
एकमेकांना देण्यासाठी खूप काही आहेअमेरिका आणि भारताने व्यापार चर्चेसाठीच्या अटी अधिकृतपणे अंतिम केल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मला वाटते. अमेरिकेत आता असे सरकार आहे, ज्याने भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला आहे. मला वाटते की, भारत आणि अमेरिकेकडे एकमेकांना देण्यासाठी खूप काही आहे. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे भागीदार म्हणून आलो आहोत, असेही व्हेन्स यावेळी म्हणाले.