Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 03:43 PM2024-09-28T15:43:50+5:302024-09-28T15:56:25+5:30
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी ही शेवटची सभा असल्याचं म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, "गेल्या आठवड्यात त्यांना जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांना भेट देण्याची संधी मिळाली आणि ते जिथेही गेले तिथे त्यांना भाजपाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला."
नरेंद्र मोदींनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर जोरदार निशाणा साधला आहे. "जम्मू-काश्मीरमधील लोक या तीन घराण्यांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. येथील लोकांना आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात नको आहे. त्यांना त्यांच्या मुलांचं चांगले भविष्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच लोक भाजपा सरकारला पाठिंबा देत आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांचा मूड भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे" असं म्हटलं आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Prime Minister Narendra Modi says, "...Remember that time when bullets were fired from that side and the Congress used to wave white flags. When the BJP government responded to the bullets with shells, the people on that side came to their senses.… pic.twitter.com/BUTBq37XTW
— ANI (@ANI) September 28, 2024
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. "आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक झाला. भारताने जगाला दाखवून दिलं होतं की, हा नवा भारत आहे, जो घरात घुसून मारतो" असं मोदींनी सांगितलं. तसेच काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याचा आरोप करत आजही काँग्रेस या मुद्द्यावर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचं म्हटलं आहे.
जम्मूच्या जनतेला विशेष आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, "इतिहासात यापूर्वी कधीही अशी संधी मिळाली नाही, जी या निवडणुकीत आली आहे. पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार सरकार स्थापन होणार आहे. ही संधी महत्त्वाची असून ती गमावू नये. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मूतील जनतेचं सर्व दुःख दूर करू." नवरात्री आणि विजयादशमीचा संदर्भ "निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी, नवरात्रीच्या दिवशी येतील आणि यावेळी विजयादशमी ही एक शुभ सुरुवात असेल" असंही म्हटलं.