Narendra Modi : मागील काही दिवसांपासून काँग्रेस अदानी प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहे. भाजपकडूनही काँग्रेसला प्रत्युत्तर दिले जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कर्नाटकमधील प्रचारसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, एअर इंडिया काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार आणि तोट्यातील व्यवसायासाठी ओळखली जायची. आज एअर इंडिया नवीन उंची गाठत आहे. छोटी शहरेही एअर कनेक्टिव्हिटीने जोडली जावीत, असा विचार काँग्रेसच्या मनात कधीच आला नव्हता, अशी टीकाही पीएम मोदींनी केली.
कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळाचे सोमवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी शिवमोग्गा विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जनतेला संबोधित केले. शिवमोग्गा विमानतळाचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, शिवमोग्गा विमानतळ भव्य आणि अतिशय सुंदर आहे. कर्नाटकची परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ या विमानतळावर पाहायला मिळतो. हे केवळ विमानतळ नाही, तर या भागातील तरुणांच्या स्वप्नांच्या नव्या प्रवासाची मोहीम आहे.
मोदी पुढे म्हणतात की, हा अमृतकल विकसित भारत बनवण्याचा काळ आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही संधी चालून आली आहे. आज जगभरात भारताचा आवाज घुमत आहे. आपल्या सर्वांना सोबतच पुढे जायचे आहे. कर्नाटकवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. भाजप सरकार हे गरीब आणि शेतकऱ्यांचे सरकार आहे. भाजप सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आहे. हे माता-भगिनींचा स्वाभिमान, माता-भगिनींना संधी आणि माता-भगिनींचे सक्षमीकरण या मार्गावर चालणारे सरकार आहे.
पीएम मोदी म्हणाले की, हा दिवस आणखी एका कारणासाठी खास आहे. आज येडियुरप्पा जी यांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांनी आपले जीवन गरीब आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. पुन्हा एकदा मला कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली आहे. आज देशात डबल इंजिन सरकारमुळे अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. तो दिवस दूर नाही, जेव्हा भारतातील नागरिक मेड इन इंडिया विमानात प्रवास करतील.'