Narendra Modi Loksabha Speech: मोदींचा भर लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल; नागालँड, गोव्यातील पराभवाच्या मालिकेवरून छेडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:41 PM2022-02-07T18:41:23+5:302022-02-07T18:47:56+5:30
Narendra Modi Loksabha Speech: एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना काँग्रेसचे वाभाडेच काढले आहेत. त्यांना देशात कोरोना पसरविणारे असा गंभीर आरोप करताना त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून काँग्रेस विविध राज्यांत हरतच असल्याचे म्हटले. नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. गोव्यात २८ वर्षांपूर्वी नाकारले. हीच परिस्थिती अन्य राज्यांत सुरु आहे. एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
नागालँडने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला निवडले होते, ओडिशामध्ये २७ वर्षांपूर्वी तर गोव्यात काँग्रेस पुर्ण बहुमतात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार आले होते. त्रिपुरामध्ये १९८८ मध्ये काँग्रेस शेवटची जिंकलेली. पश्चिम बंगालने तर १९७२ मध्ये काँग्रेसला मत दिले होते. तेलंगानाचे राज्य निर्माण करण्याचे श्रेय काँग्रेसने घेतले परंतू जनतेने त्यांना नाकारले, असा लेखाजेखाच मोदी यांनी संसदेत ठेवला.
"तुम्ही ज्या पद्धतीची विधानं करताय आणि वागताय, ते पाहता १०० वर्षं सत्तेत यायचं नसल्याचं तुम्ही मनातून पक्कं केलंय असं वाटतं. आता तुम्हीच तयार आहात, तर मीही तयारी करून ठेवलीय," असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. थोडी जरी आशा असती किंवा जनता आपल्या परत आणेल अशी जरी आशा असती तर असं केलं नसतं, असंही ते म्हणाले. याचबरोबर तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही, असा सणसणीत टोलाही लगावला आहे.
कोरोना काळानंतरही जग नव्या व्यवस्थेच्या मार्गाकडे जात आहे. भारताला या प्रकरणी मागे राहायचं नाही. भारतानं ही संधी गामावू नये, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.