लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. कोरोना देशभरात काँग्रेसने पसरविल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. अशीच परिस्थिती गोव्यात आलीय, तरीही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला. याचबरोबर पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला.
कोरोनामुळे परिस्थिती बिघडविण्याची योजना होती. नरेंद्र मोदी कसा सामोरा जाणार, अपयशी होणार असा त्यांचा प्लॅन होता. म्हणून मुंबईच्या स्टेशनवर श्रमिकांची गर्दी जमविण्यात आली. युपी, बिहारच्या लोकांना पाठविण्यात आले. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
हा देश तुमचा नाहीय का? देशातील लोक, त्यांची सुख-दुःख आपली नाहीत का? कोरोनाचे एवढे मोठे संकट आले, कोणत्या नेत्यांनी मास्क घाला, अंतर ठेवा असे लोकांना सांगितले. जनतेला हे या नेत्यांनी सांगितलं असतं तर भाजपाला किंवा मोदींना काय फायदा होणार होता? पण एवढ्या मोठ्या संकटातही पवित्र काम करायला विसरले, असा आरोप मोदी यांनी केला.