मुंबई - राजधानी मुंबईत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर, शिवसेना बाळासाहेब या नावारुन उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला चांगलंच सुनावलं. तुमच्या बापाचं नाव वापरुन मतं मागा, शिवसेनेच्या बापाचं नाव वापरुन मतं मागू नका, असेही ते म्हणाले. यावर, आता शिंदेंच्या मुख्य प्रवक्त्याने प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, आमची मागणी ही केवळ भाजपसोबत सरकार स्थापनेची आहे, असेही त्यांनी म्हटलं. तसेच, मोदींचं शिवसेना प्रेमही सांगितलं.
राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ पाहायल मिळत आहे. शिंदे गटासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच, शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
आम्ही निवडणूक लढवली तेव्हा शिवेसना-भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. ज्यावेळी, आम्ही भाजपला सोडलं, तेव्हा लोकं रस्त्यावर उतरली होती का, असा सवाल केसरकर यांनी विचारला. तसेच, पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना जेव्हा सत्य परिस्थिती समजेल, तेव्हा त्यांनाही वाटेल की, आम्ही जो निर्णय घेतला होता, तो लोकांना योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही आमचा निर्णय बदलतो, असे म्हणत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. तसेच, हा त्यांच्याकडील पर्याय आहे, असेही ते म्हणाले.
भाजप शिवसेनेनं एकत्र राहिले पाहिजे
मी राष्ट्रवादीतच होतो, माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, माझ्या एकट्याचे संबंध असून काय उपयोग. आमचे आमदार राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलचे गाऱ्हाणे आमच्याकडे मांडत होते. मी कोकणात एवढी मोठी लढाई केली. मलासुद्धा पंतप्रधान कार्यालयातून बोलाविण्यात आलं होतं. मी का नाही गेलो, कारण मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना लढते. मी दिल्लीवरुन एवढ्या मोठ्या माणसाला न भेटता परत आलो. विशेष म्हणजे मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुखांना सांगत आहे की, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रच राहिलं पाहिजे.
मातोश्रींबद्दल मोदींना अतिशय प्रेम
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान जेव्हा एका दिशेने चालतात तेव्हा ते राज्य मोठं होतं. महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र मोठा होईल, भारतसुद्धा मोठा होईल. पंतप्रधान मोदींना मातोश्रीबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल अतिशय प्रेम आहे. तसं असतानाही केवळ राज्यातील कोणी आपल्याला त्रास देत आहे, म्हणून भूमिका वेगळी घेतली. पण, ते तिथं बोललं जाऊ शकलं असतं, असेही दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.