लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच दरम्यान, यूपीमध्ये भाजपाला किती जागा मिळतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले की, "आम्हाला मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील."
"2017 मध्ये यूपीमध्ये काँग्रेस आणि सपा यांच्यात युती झाली. 2019 मध्ये एकत्र होते आणि 2022 मध्येही झाली होती. यांना पराभूत करण्याची हॅट्ट्रिक आम्ही आधीच केली आहे. उत्तर प्रदेशातील लोक कुटुंबावर आधारित पक्षांना कंटाळले आहेत. या राजकीय पक्षांची विचारसरणी कुटुंबाच्या पलीकडे जात नाही."
"त्यांचे राजकारण कधीच विकासाचे नसते. अशीही चर्चा सुरू आहे की, त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सीटचं काय होणार? त्यांच्या कुटुंबातील हा सदस्य जिंकेल की नाही? घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते" असं मोदींनी म्हटलं आहे.
यूपीमध्ये भाजपाच्या जागांच्या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, यूपीमध्ये भारतीय जनता पक्षाचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. आज उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था बदलताना दिसत आहे. अशी सुरक्षिततेची भावना त्यांना यापूर्वी कधीच जाणवली नव्हती. यावेळी राज्यात सर्व विक्रम मोडीत निघणार असून भाजपा जास्त जागा जिंकणार आहे.