नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर येथील एका एका गुहेत ध्यानधारणा केली होती. नरेंद्र मोदींच्या या ध्यानधारणेचे वृत्त जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले आणि केदारनाथमधील ही गुहा चर्चेत आली होती.
सध्या हीच गुहा ध्यानधारणा करण्यासाठी हाऊसफुल होत आहे. या गुहेसाठी ऑक्टोबरपर्यंत बुकिंग झाले आहे. त्यामुळे केदारनाथमधील ही गुहा आता विशेष पर्यटन स्थळ बनली आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी म्हणजेच 18 मे रोजी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर रात्रभर एका गुहेत ध्यानधारणा केली. ही गुहा मुख्य केदारनाथ मंदिरापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर आहे.
नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेनंतर या गुहेत जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 65 दिवसांत याठिकाणी 46 भाविकांनी ध्यानधारणा केली आहे. तर, ऑक्टोबरपर्यंत गुहेत धानधारणा करणाऱ्या भाविकांनी बुकिंग केले आहे. गढवाल मंडळ विकास निगमच्या माहितीनुसार, आतापर्यंत या गुहेच्या माध्यामातून 95 हजार रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. या गुहेत धानधारणा करणाऱ्या भाविकांना प्रतिरात्र 1500 रुपये आणि प्रतिदिन 990 रुपयापर्यंत शुल्क आकारण्यात येत आहे.
केदारनाथमधील ही गुहा समुद्रसपाटीपासून 12 हजार फूट उंचीवर आहे. एक भलामोठा दगड कापून ही गुहा तयार करण्यात आली आहे. या गुहेत वीज, पाणी यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच, या गुहेला एक खिडकी आहे, जिथून केदारनाथ मंदिराचे अत्यंत विलक्षण रुप पाहायला मिळते. ही गुहा पंतप्रधान मोदींनी दौरा करण्याच्या काही महिन्यांपूर्वी तयार झाली आहे.