ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 22 - बनारस हिंदू विद्यापीठाने देऊ केलेली डॉक्टरेट ही पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाकारली आहे. अशा पदव्या स्वीकारणं, आपल्या धोरणामध्ये बसत नसल्याचे सांगत मोदी यांनी ही पदवी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिल्याचे विद्यापीठाचे प्रवक्ते राजेश सिंग यांनी सांगितले.
आज मोदी वाराणसीच्या दौ-यावर असून विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभास ते उपस्थित राहिले आहेत. याचवेळी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित करण्याचा विद्यापीठाचा मानस होता. त्यांनी तसे पत्र मोदींना पाठवले, परंतु मोदींनी वाराणसीमध्ये कार्यक्रमास उपस्थित राहण्यास तयारी दर्शवली मात्र डॉक्टरेट स्वीकारण्यास नकार दिला.
याआधीही मोदींनी अशा प्रकारचा बहुमान स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. अमेरिकेमध्ये 2014 मध्ये मोदी गेले असता, लुईसियाना विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट देण्याची ईच्छा व्यक्त केली होती. गुजरातमध्ये महिलांच्या व अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना डॉक्टरेट देण्याचा लुईसियाना विद्यापीठाचा मानस होता. परंतु, मोदींनी त्यांनाही नकार दिला होता. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदाने गौरवण्याचे प्रस्ताव आले होते, जे मोदींनी धोरणात्मक निर्णय म्हणून नाकारले.