नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत एक मोठी चूक झाली. पंजाब दौऱ्यात फिरोजपूर येथे मोदींच्या उपस्थित एक मोठी रॅली होणार होती. पण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटानं मोदींचा ताफा रस्त्यामध्येच थांबवला. एका उड्डाणपुलावर जवळपास 15 ते 20 मिनिटं मोदींची गाडी अडकली होती. देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी चूक असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. या घटनेवरुन काँग्रेस आणि भाजपात सामना रंगला आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते आणि भाजपा नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
पंजाबमधील घटनेवर भटिंडा विमानतळावर पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील खोचक टीका करत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यावर निशाणा साधला. एअरपोर्टवर जिवंत पोहोचू शकलो याबाबत मुख्यमंत्र्यांना माझे आभार सांग, असं पंतप्रधान मोदी विमानतळावरील अधिकाऱ्याला म्हणाल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केलाा आहे. तर, काँग्रेस नेते बी.व्ही. श्रीनिवास यांच्या ट्विटवरुनही स्मृती इराणींनी काँग्रेसला सुनावलंय.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते" असं म्हणत स्मृती इराणी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच "पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते."
"पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास जाणूनबुजून खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला, 20 मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचवलं?" असं म्हणत स्मृती इराणी यांनी टीकास्त्र सोडलं. तसेच, 20 मिनिटांपर्यंत पंतप्रधान मोदींचा जीव धोक्यात असतानाही काँग्रेस, हाऊज द जोश? असा सवाल करतेय. काँग्रेस मोदींचा तिरस्कार करते हे आम्हाला माहिती आहे. काँग्रेस नेत्यांना या घटनेचा आनंद झाल्याचे सांगत, इराणी यांनी काँग्रेस नेते बी.व्ही श्रीनिवास यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, काँग्रेस नेते श्रीनिवास बी. व्ही. यांनी ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली स्थगित झाल्यानंतर मोदींवर हल्लाबोल करत भाजपवर टीका केली होती. मोदीजी, हाऊज द जोश? असा प्रश्नार्थक सवाल श्रीनिवास यांनी विचारला होता.
कृषी कायदे रद्द झाल्यानंतर मोदींचा पहिलाच पंजाब दौरा
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठं बळ पंजाब-हरियाणातून मिळालं होतं. अखेर कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूर इथं त्यांची रॅली होती. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.