ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १३ - नरेंद्र मोदी हे माझे हीरो असून ते भारताचे पंतप्रधान म्हणून ते खूप मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास अमेरिकी बडी कंपनी फोर्डचे सीईओ अॅलन मुलाली यांनी व्यक्त केला आहे. मुलाली लवकरच निवृत्त होत असून एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गेली अनेक वर्षे मोदींची भाषणे आपण ऐकत असून त्यांचं कामही बघितलं आहे. आर्थिक विकासावर त्यांचा भर असून ते भारतासाठी फार महत्त्वाची कामगिरी बजावतील असे मुलाली म्हणाले. आठ वर्षांपूर्वी १७ अब्ज डॉलर्सनी तोट्यात असलेल्या फोर्डची सूत्रे हातात घेतलेले मुलाली अत्यंत कार्यक्षम अधिकारी मानले जातात आणि उद्योगविश्वामध्ये त्यांचा दबदबा आहे.
मोदींचा भर या पायाभूत सुविधांवर असून ती सगळ्यात महत्त्वाची बाब असल्याचे मुलाली म्हणाले. भारत हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेला असून लहान व मध्यम आकाराची वाहने तयार करण्यात व निर्यात करण्यात भारत अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतो. भारताने उत्पादन क्षेत्रावर भर द्यायला हवा असा सल्ला या उद्योदजगतातील दिग्गजाने दिला असून त्यामुळे रोजगार निर्माण होतो तसेच सगळ्यांसाठी आर्थिक वाढ होते असे सांगितले.
गुजरातमधला आपला अनुभव खूपच चांगला असून उद्योगांना तिथे प्रचंड प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असल्याचे मुलाली म्हणाले. गुजरात सरकारने आम्हाला सतत सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे मुलाली व मोदी यांची एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नसूनही केवळ त्यांच्या बघितलेल्या कामामुळे ते मोदींच्या प्रेमात पडले आहेत व मोदींना ते आपला हीरो मानतात.