Narendra Modi NDA Meeting : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी(दि.7) दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक झाली आणि त्यात सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नेतेपदी निवड केली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिलं आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला शेलक्या शब्दात टोला लगावला.
10 वर्षांत 100 जागांचा आकडा गाठता आलेला नाहीयंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे विरोधक सातत्याने टीका-टिप्पणी करत आहेत. त्या सर्व टीकांना पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, ''आम्हाला कमी जागेवरुन बोलले जात आहे, पण काँग्रेसला दहा वर्षांनंतरदेखील शंभर जागांचा आकडा गाठता आलेला नाही. 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये मिळून जेवढ्या जागा त्यांना मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा यंदा आम्हाला मिळाल्या आहेत. भविष्यात त्यांचा आकडा खूप वेगाने खाली येणार आहे. हे लोक आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांना मान देत नाहीत,'' असा टोला मोदींनी यावेळी लगावला.
EVM वरुन विरोधकांवर निशाणा निवडणुकीपूर्वी विरोधक सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत होते. याबाबत नरेंद्र मोदी म्हणाले की, "4 जूनपूर्वी हे लोक (इंडिया आघाडी) सातत्याने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. या लोकांचा भारतातील लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडाला होता. मात्र 4 जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
देशाला सुशासन दिले आहे"एनडीए सरकारने देशाला सुशासन दिले आणि एक प्रकारे एनडीए हा शब्द सुशासनाचा समानार्थी बनला आहे. गरीब कल्याण आणि सुशासन हे आपल्या सर्वांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली, त्यादृष्टीने एकदिलाने प्रयत्न करणे आणि देशाला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसर सोडू न देणे, ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे," असंही ते यावेळी म्हणाले.