आगरताळा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आगरतळातल्या शांतीर बाजार येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान मोदींनी कम्युनिस्टांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी म्हणाले, न्यू इंडिया आणि न्यू त्रिपुरासाठी काम करणा-या लोकांना मी आवाहन करतो की, या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून पायउतार करा आणि भाजपा विजय मिळवून देत विकासाला चालना द्या. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हे अराजकवादी असतात.निवडणुकीदरम्यान ते गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांचा गणतंत्र नव्हे, तर गनतंत्र या संस्कृतीवर विश्वास आहे. केंद्र सरकार गरिबांना घरं बनवण्यासाठी पैसे देते. तसेच वीज पोहोचवण्यासोबतच गॅसची शेकडी घेण्यासाठी पैसेही देतो. परंतु तो पैसा कुठे जातो माहीत नाही. कम्युनिस्ट पक्षाच्या माणसांचं काँग्रेसबरोबर लागेबांधे असल्यानं कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही, अशा आविर्भावात असतं. काँग्रेस त्रिपुराच्या निवडणुका का लढवतेय. दिल्लीत मैत्री आणि त्रिपुरात विरोध करण्याचं नाटक कशासाठी ?, सर्व ठिकाणी एकत्र लढतात. मात्र त्रिपुरामध्ये वेगवेगळे का लढतायत ?, हा फक्त मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे वेगळे असल्याचा चुकीचा समज करून घेऊ नका, असंही मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे.कम्युनिस्टांना या निवडणुकीत मुळासकट उखडून टाका, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कामगार असल्याचा केवळ दिखावा करतात. त्रिपुराच्या मजुरांना अद्याप कामाची किमान मजुरीही मिळत नाही. पण भाजपाचं सरकार सत्तेवर आल्यात पहिलं हेच काम करण्यात येईल. देशात सातवा वेतन आयोग लागू आहे, तर त्रिपुरात चौथा, सरकार कर्मचा-यांना पैसे न मिळाल्यास ते भ्रष्टाचारच करणार ना, आमचं सरकार अस्तित्वात आल्यास आम्ही सातवा वेतन आयोग लागू करू, असं आश्वासनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.
कम्युनिस्टांचा गणतंत्रावर नव्हे, तर 'गनतंत्रा'च्या संस्कृतीवर विश्वास- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 5:14 PM