नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे हिंदू नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. 'एक पंतप्रधान किती वेळा मंदिरात जातात. मोदींनी हिंदू धर्म सोडून फक्त हिंदुत्वाचा विकास केला आहे, ज्याचं हिंदू धर्माशी काही घेणं-देणं नाही. ते खरे हिंदू नाहीत. जो व्यक्ती प्रत्येक भारतीयाला आपली बहिण, आई मानतो, तोच खरा हिंदू आहे', असं कपिल सिब्बल बोलले आहेत. राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरुन वाद सुरु असून, नरेंद्र मोदींच्या टिकेला उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा केली होती. गेल्या तीन महिन्यात 19 वेळा राहुल गांधींनी मंदिराला भेट दिली आहे. यावरुनच पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव घेतना सोमनाथ मंदिरात तुमच्या पुर्वजांनी बनवलेलं नाही अशी टीका मोदींनी केली होती. नरेंद्र मोदी बोलले होते की, 'आज सोमनाथ संपुर्ण जगभरात प्रसिद्द आहे. आज ज्या लोकांना सोमनाथ मंदिराची आठवण येत आहे, त्यांना इतिहास माहित आहे का विचारा'.
गुजरातमधील सोमनाथ मंदिराला नुकतीच राहुल गांधींनी भेट दिली. यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. या वादावर काँग्रेसनेही स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे केवळ हिंदू नसून ते जानवेधारी हिंदू आहेत असे वक्तव्य करत काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाला भाजपला जबाबदार धरले आहे. राहुल गांधी यांची अहिंदू म्हणून रजिस्टरमध्ये नोंद होण्यामागे भाजपचा हात असल्याचा थेट आरोपच सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथील हिंदुंची मत वळवण्याचा त्यांनी सपाटाच लावला आहे. बुधवारीही ते अहमद पटेल यांच्यासमवेत सोमनाथ मंदिरात गेले होते. त्यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सोमनाथ मंदिरातल्या त्या नोंदीमुळे त्यात भर पडली आहे. ?