- संजय शर्मानवी दिल्ली - कोणत्याही मंत्र्याकडे असलेली फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलवर राहणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही मंत्र्याने कोणत्याही अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता फाईल वाचल्याशिवाय सही करू नये, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे नव्या मंत्र्यांना दिले.
मोदी सरकार ३.० च्या शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी नव्या सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी चहापानासाठी बोलावले आणि सरकार चालविण्यासाठी ठोस मार्गदर्शक सूचना केल्या. जवळपास दोन तास चाललेल्या पंतप्रधान मोदींच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना ताकीद दिली की, कोणत्याही अधिकाऱ्याने कितीही दबाव आणला तरी त्यांनी कोणत्याही फाईलवर पूर्ण वाचल्याशिवाय सही करू नये.
१०० दिवसांच्या राेडमॅपबाबतही माेदींनी यावेळी चर्चा केली. या राेडमॅपवर काम करायचे आहे तसेच सर्व प्रलंबित याेजना लागू करायच्या आहेत, असे माेदींनी स्पष्ट केले.
पीएमओकडून बारीक लक्ष- पंतप्रधान कार्यालय सर्व मंत्रालयांवर थेट लक्ष ठेवेल. सर्व मंत्र्यांना पारदर्शकतेने काम करण्यास सांगितले आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी सर्वांना एकत्र काम करावे लागेल, असेही पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. - मोदींनी पहिल्या दिवसापासून सर्व मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयांसाठी १०० दिवसांचा अजेंडा निश्चित करण्यास सांगितले आहे. तुम्ही लवकरात लवकर कामे पूर्ण करा. टार्गेटची चिंता करा, असे निर्देश माेदींनी दिले.
पर्सनल स्टाफमध्ये नातेवाईक नको- सरकारच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले की, कोणतीही फाईल २४ तासांपेक्षा जास्त काळ टेबलावर राहू नये. - मंत्रालयात फायलींचा ढीग नसावा, जनतेच्या हिताचे निर्णय लवकर घेतले जावेत. कोणत्याही मंत्र्यांनी पर्सनल स्टाफमध्ये आपले कुटुंबीय, नातेवाइकांना स्थान देऊ नये.- मंत्र्यांनी काेणतेही असे काम करू नये, जे करायला नकाे. तसे केल्यास तत्काळ मला माहिती मिळेल, असे माेदी यांनी यावेळी सांगितले.