- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी सायंकाळी ७:१५ वाजता शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा होणार असून, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत.
नव्या मंत्र्यांना रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून फोन जाणार आहे. त्यांना पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आपल्या निवासस्थानी बोलविणार असून, तेथे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ‘मोदी सरकार ३.०’ च्या शपथविधी सोहळ्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. नियमानुसार केंद्रीय मंत्रिमंडळात ७८ मंत्री असतात; परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४० ते ४५ मंत्री रविवारी शपथ घेतील. त्यासाठी एनडीएच्या घटकपक्षांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे मंत्र्यांची नावे सादर केली. ही नावे अंतिम करण्याबाबत केंद्रीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरू आहे.
लोकसभाध्यक्ष, भाजपाध्यक्ष पदांसाठी या नावांची चर्चाभाजपने लोकसभा अध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीने एका नेत्याची त्यासाठी निवड केली जाईल. मनोहरलाल खट्टर यांच्यापासून ते शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत काही नावांची चर्चा आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात आला होता. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान, सी. आर. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आरएसएसची पसंतही विचारात घेतली जाईल.
रक्षा खडसे, पंकजा मुंडे यांना संधी? डॉ. भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देण्याचाही भाजपश्रेष्ठींवर दबाव असून, लोकसभेवर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसे, बीडमध्ये पराभूत पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे.
संभाव्य मंत्र्यांमध्ये देशातून आणखी कोण-कोण? अमित शाह, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, नित्यानंद राय , ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराजसिंह चौहान, फग्गनसिंह कुलस्ते, शोभा करंदलाजे, किशन रेड्डी, बंडी संजय, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल