नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनप्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले असताना त्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद देऊ केल्यामुळे अडचण निर्माण होऊन पटेल यांचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.
संसदेतील ज्येष्ठतेनुसार पटेल कॅबिनेट मंत्रिपदाला पात्र असले तरी शिवसेनेचे लोकसभेवर सात खासदार निवडून आले असताना प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपदच दिले जात आहे. अशा स्थितीत लोकसभेवर एकच खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्यास महायुतीमुळे नाराजी निर्माण होण्याची शक्यता होती.
या मुद्यावर खा. सुनील तटकरे यांच्या २, गुरुद्वारा रकाबगंज रोड निवासस्थानी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची दोन तास गहन चर्चा झाली. पण पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदच दिले जावे, असा आग्रह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरल्यामुळे भविष्यातील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश करण्याचा तोडगा निघाला.
प्रफुल्ल पटेल यांची प्रतीक्षा करण्याची तयारीयापूर्वी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद भूषविल्यामुळे आपण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार स्वीकारण्याऐवजी आपण प्रतीक्षा करू, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी घेतली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये यावरून कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पटेल यांच्यापाठोपाठ तटकरे यांनीही मंत्रिपदावर दावेदारी केल्याचे वृत्त काही काळ पसरले होते. पण ते भ्रामक ठरले. काही दिवस थांबण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविल्याने नाराजी मिटली आहे.
विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद देणार : देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या वतीने राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराचे मंत्रिपद देऊ करण्यात आले होते. पण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांची अडचण होती.त्यामुळे भविष्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या. तोपर्यंत आम्ही थांबायला तयार आहाेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत म्हटल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कॅबिनेट मंत्रिपदासाठी वाट पाहणार : अजित पवार प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री राहिले असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र प्रभार असलेले राज्य मंत्रिपद स्वीकारणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहायला तयार आहोत.त्यावर आमची सहमती झाली आहे. आमचे सध्या लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार असून, नजीकच्या भविष्यात राज्यसभेच्या आणखी दोन खासदारांची भर पडून आमची संख्या चार होणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले.