पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, "अलोकतांत्रिक, असंवैधानिक आणि बेकायदेशीर मार्गाने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला मी शुभेच्छा देऊ शकत नाही."
नरेंद्र मोदी हे रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार का असं विचारलं असता ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "हे सरकार अलोकतांत्रिक, असंवैधानिक आणि बेकायदेशीर पद्धतीने सत्तेवर येत आहे. याबद्दल मला खेद वाटतो. मी देशासाठी शुभेच्छा देऊ इच्छिते. भविष्यासाठी आपण सर्वश्रेष्ठ गोष्टींची आशा करू."
"मला आमंत्रण मिळाले नाही आणि मी जाणार नाही"
"एनडीए ब्लॉकमधील पक्षांच्या अनेक मागण्या आहेत आणि या सत्ताधारी आघाडीचं पुढे काय होतं ते पाहण्यासाठी वाट पाहावी लागेल." दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. "मला आमंत्रण मिळालेलं नाही आणि मी जाणारही नाही" असं म्हटलं आहे.
"एनडीए सरकार काही काळच सत्तेत राहणार"
"कोणीही असा विचार करू नये की I.N.D.I.A ने अद्याप सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, त्यामुळे भविष्यातही असं करणार नाही. आम्ही तशा परिस्थितीची वाट पाहत आहोत. देशाला बदलाची गरज आहे. कोणालाही मोदी नको आहेत. यांच्या सीटचं नुकसान झाल्यानंतर मोदींनी दुसऱ्यासाठी जागा सोडावी. I.N.D.I.A. ब्लॉकने अद्याप आपला दावा केला नसला तरी अखेरीस सरकार स्थापन करेल आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार थोड्या काळासाठीच सत्तेत राहील" असं म्हटलं आहे.