Narendra Modi Oath Taking Ceremony : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ला बहुमत मिळाल्यानंतर आज (दि.9) अखेर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबतच इतर 69 खासदारांनाही गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रात स्थान मिळणार होते, पण ऐनवेळी त्यांनी नकार दिला. तसेच, आजच्या शपथविधी सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली नाही. तर, दुसरीकडे अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातील भाजपचेचे अनेक नेते उपस्थित होते.
PM Narendra Modi : मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ...
आज सकाळपासूनच मोदी सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत होती. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचेही नाव आघाडीवर होते. त्यांना कॅबिनेट मंत्री केले जाईल, अशी चर्चाही सुरू झाली. पण, भाजपने त्यांना स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली. अजित पवारांसह पटेलांनी ही ऑफर धुडकावून लावली. पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते, त्यामुळे स्वतंत्र प्रभार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळेच मोदी सरकार 3.0 मध्ये त्यांना संधी मिळाली नाही.
अजित पवार काय म्हणाले?प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी न मिळाल्याबदादल अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "आम्ही भाजपला विनंती केली होती की, संसदेत राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या चार होणार असल्याने आम्हाला एक मंत्रिपद मिळावे, त्यांनी ठीक आहे म्हटले. त्यानंतर त्यांचा आम्हाला मेसेज आला की एका सदस्याला संधी देण्यात येईल, पण कॅबिनेटऐवजी राज्यमंत्रिपद मिळेल. सर्वांना माहित आहे की, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री असताना राज्यमंत्रिपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटले नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले," असा खुलासा अजित पवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?"राष्ट्रवादीला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद-स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते याआधी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार करता येणार नाही. पण जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केलेले असतात. एका पक्षाकरता ते निकष बदलता येत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यांचा विचार नक्की केला जाईल," असे फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.