Narendra Modi Oath Taking Ceremony : भारताच्या राजकारणात आज ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएमधील सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या (TDP) दोन खासदारांची केंद्रात वर्णी लागणार आहे. यामध्ये श्रीकाकुलममधून तीन वेळा खासदार राहिलेले 36 वर्षीय किंजरापू राम मोहन नायडू आणि पहिल्यांदाच खासदार झालेले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (48) यांच्या नावांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम मोहन नायडू यांना कॅबिनेट मंत्री, तर पेम्मासानी यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. राज्यातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक असलेल्या राम मोहन नायडू यांनी उत्तर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलममधून YSRCP च्या टिळक पेराडा यांचा तब्बल 3.2 लाख मतांच्या फरकाने पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. नायडू यांना 7 लाख 54 हजार 328 मते मिळाली, तर YSRCP उमेदवार टिळक पेराडा यांना 4 लाख 26 हजार 427 मते मिळाली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला फक्त 7172 मते मिळाली.
कोण आहेत राम मोहन नायडू ?राम मोहन नायडू यांचे वडील येरन नायडू हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. 1996 ते 1998 दरम्यान ते संयुक्त आघाडी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांचे काका के अत्चेनायडू हे टेक्कालीचे आमदार आणि टीडीपी राज्य युनिटचे अध्यक्ष आहेत. दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर राम मोहन नायडू यांनी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर लाँग आयलंडमधून एमबीए केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजकाणात एंट्री घेतली आणि आता त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
श्रीमंत खासदारांच्या यादीत चंद्रशेखर यांचा समावेश टीडीपीचे दुसरे नेते डॉ.चंद्रशेखर केंद्रीय मंत्री होणार आहेत. त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून टीडीपीसाठी काम करत आहे. टीडीपीने चंद्रशेखर यांना गुंटूरमधून पहिल्यांदा तिकीट दिले आणि त्यांनी वायएसआरसीपीच्या किलारी व्यंकट रोसैया यांचा पराभव केला होता. TDP नेत्याला 8 लाख 64 हजार 948 मते मिळाली, तर YSRCP नेते किलारी वेंकट रोसैया यांना 5 लाख 20 हजार 253 मते मिळाली.
विशेष म्हणजे डॉ. चंद्रशेखर लोकसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे 5,785 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. डॉ. चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये डॉ. एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एमबीबीएस केले आहे, त्यानंतर 2005 मध्ये अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी केले आहे.