नवी दिल्ली - सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, फेसबुक या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. त्यामुळे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात या माध्यमाचा वापर करताना दिसतात.
देशात असो जगात नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. मात्र सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली होती. टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.
पण मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला आहे. ८ मार्च, रविवारी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा, यासाठी #SheIndpriesUs हा हॅशटॅग वापरा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला? हा प्रश्न सर्वांना पडला होता. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरु करण्यात आला होता. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली होती. प्रत्येकाला उत्सुकता होती की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला असेल. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहण्यापूर्वीच मोदींनी उत्तर दिलं आहे.
मोदींच्या या ट्विटवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या होत्या. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास ही मंडळी अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं योग्य नाही. कारण हीच मंडळी त्यांचे सायबर योद्धे आहेत. योद्धे सेनापतींच्या आदेशावरुन काम करतात. पण सेनापतींनीच सोशल मीडियाचं मैदान सोडलं तर मग फौज काय करणार असा सवाल शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला होता. तर राहुल गांधी यांनी मोदींनी द्वेष सोडावा सोशल मीडिया नाही असा चिमटा काढला होता.