अहमदाबाद - देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी त्यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे. हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ साली झाला होता. यंदा १८ जून २०२२ मध्ये त्या आपल्या १०० व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. पंतप्रधान देखील आज गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ मंदिराला भेट देतील. त्यानंतर वडोदरा येथील एका रॅलीला संबोधित करतील.
हिराबेन यांच्या नावानं गांधीनगरमध्ये रस्ता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या नावानं गांधीनगरमध्ये एका रस्त्याचं लोकार्पण देखील होणार आहे. गांधीनगर येथे रायसणला जोडणाऱ्या रस्त्याला हिराबेन मोदी यांचं नाव दिलं जाणार आहे.